girgaon dhwaj pathak

हिंदू नववर्ष स्वागत यात्रा

गिरगांवचा पाडवा 

SVYP Drawing competetion

कै. सुनील निकम

चित्रकला स्पर्धा

pragati pratishthan project

सामाजिक संस्थांना

मदत

गिरगांवचा पाडवा

सस्नेह नमस्कार !

चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे ‘सुजलाम् सुफलाम्’ असा वसंत ऋतू ! भगवान श्रीकृष्णानेही या ऋतूचे वर्णन ‘ऋतूनां कुसुमाकरः’ असे केले आहे. वसंतपंचमीला आरंभ होणारा हा वसंत ऋतू चैत्र शुद्ध प्रतिपदेला आपल्या सोळा कलांनी फुलून जातो. जणू संपूर्ण निसर्ग आपल्या युवावस्थेत असतो !

अशा चैतन्याच्या, प्रसन्नतेच्या, आनंदाच्या दिवशी गुढीपाडवा या मंगलदिनी आपण वर्षारंभ करतो. निसर्गाचे सृष्टीचे चक्रही यादिवशी नवीन कार्याला आरंभ करावा हेच जणू सुचवत असते ! थंडीतील पानझडीचा ऋतू संपून झाडावर नवी कोवळी चैत्रपालवी दिसू लागलेली असते. उत्तरायण सुरु झाल्याने आता अंधःकाराचे साम्राज्य हळू हळू कमी होत नवे प्रकाशपर्व सुरु होत असते. निसर्ग तुम्हां आम्हां सर्वांना मरगळ, निराशा सर्व काही झटकून नववर्षाचे स्वागत जल्लोषात करण्यासाठी खुणावत असतो.

स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठान आयोजित हिंदू नववर्ष स्वागत यात्रेच्या माध्यमातून सर्व गिरगांवकर अशाच अपूर्व जल्लोषाने नववर्षाचे स्वागत करतात. घराघरात उभारलेली नववर्षाची गुढी, पारंपरिक वेशातील उत्साही स्त्री-पुरुष मुले यांचा सहभाग, श्रीरामांचा विजयध्वज अर्थात, भगवा ध्वज हाती घेतलेले भव्य ध्वजपथक, ढोलपथक, यात्रा मार्गावरील भव्य रांगोळ्या, सांस्कृतिक नृत्य, नाट्य, वेशभूषा रंगविणारे चित्ररथ या सर्वांसह एक भव्य परंतू शिस्तबद्ध नववर्ष स्वागत यात्रा गिरगावकर साजरी करतात. अनेक संपर्क माध्यमांद्वारे जगभर गेलेला हा ‘गिरगांवचा पाडवा’ आता खऱ्या अर्थाने ‘ग्लोबल’ झाला आहे.

‘अविस्मरणीय अनुभूतींची, भ्रमंती महाराष्ट्राची’

या संकल्पनेवर आधारित यावर्षीच्या यात्रेत महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्रे, उत्तुंग डोंगररांगा, विस्तीर्ण सागरकिनारे, पवित्र नद्या, शिल्प, लेणी आणि असंख्य पर्यटनस्थळे केंद्रस्थानी आहेत. तुम्हां-आम्हां सर्वांच्या अभिमानाचा विषय असलेल्या महाराष्ट्राचे एक आगळे-वेगळे दर्शन यात्रेत घेऊया!

चैत्र शुद्ध प्रतिपदा शके १९४०, रविवार दि. १८ मार्च २०१८ रोजी ठीक ८ वाजता गिरगावातील फडके श्रीगणेश मंदिरापासून यात्रेचा शुभारंभ होईल. राजा राममोहन रॉय मार्ग, गिरगाव रस्ता, ठाकुरद्वार या मार्गाने यात्रा पुढे जाईल. दुपारी १ वाजता श्रीसिद्धीविनायक मंदिर न्यास आयोजित श्रीसिद्धीविबाक दर्शन सोहळ्याने व महाआरतीने यात्रेची सांगता होईल.

नववर्षाचे स्वागत जल्लोषाने, आनंदाने करण्यासाठी व येणारे संपूर्ण वर्षही मंगलमय असो अशी शुभकामना सर्वांना देण्यासाठी आपण सर्वांनी यात्रेत सहभागी व्हावे असे आग्रहाचे आमंत्रण !